स्थापना - २७ मार्च १९३३, चैत्र शु.१ शके १८५५


अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: । इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

वसतिग्रृहाचे प्रणेते

image

कै. ल. वि. केळकर

संस्थापक

image

कै. बाळाजी हरी मराठे

आणि स्थापना झाली...

            आपल्या या संस्थेची स्थापना २७ मार्च १९३३ रोजी श्री. बाळाजी हरी मराठे यांनी केली. श्री. बाळाजी हरी मराठे हे सरकारच्या सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरीस होते. आपल्या गुणांच्या जोरावर ते सरकारकडून या हुद्यापर्यंत चढले व रत्नागिरीस बदलून आले. त्यांचे शिक्षण लोकाश्रयावर झाले असल्याने गरीब विद्यार्थ्यांबद्दल त्यांना फार कणव असे. विद्दार्थी कितीही बुध्दीमान असला तरी केवळ गरीबीमुळे व जरुर ती मदत वेळेवर न मिळाल्यामुळे त्याचे जन्माचे नुकसान होते याची पुर्ण जाणीव त्यांना झाली होती. म्हणून आपल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांकरिता काही करता आले तर पहावे हा विचार नोकरीत असतानाच त्यांचे मनात घोळत होता. हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. स्वत:ला या कार्याकरिता वाहून घेता यावे म्हणून ते विहीत वयोमर्यादेपूर्वीच पाच वर्षे सेवा निवृत्त झाले.

            “माझं उर्वरीत आयुष्य सर्व बाजूनी सर्वांनी उपेक्षिलेल्या माझ्या चित्पावन ज्ञातीच्या व विशेषत: त्यातील गरिब व होतकरु विद्यार्थांच्या उत्कर्षार्थ वेचण्याचा मी निश्चय केला आहे”. असे त्यांनी आपल्या युरोपियन वरिष्ठास आपल्या निवृत्तीच्या कारणात नमूद केले होते.

            सेवानिवृत्तीनंतर लवकरच रत्नागिरी शहरातील काही प्रतिष्ठित मंडळींना भेटून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच हा विचार उचलून धरला व लगेच संस्था स्थापनेच्या विचारार्थ श्री. ज. ना. तथा जनुभाऊ लिमये वकील यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. ह्या विचार सभांत रा. सा. गो. बा. रानडे, श्री. स. ग. भिडे वकील, श्री. द. का. भावे, श्री. ग. बा. चितळे वकील, अँड. वि. के. भागवत, श्री. गो. वि. गोगटे, डॉ. अ. वा. जोशी, श्री. ग. ह. गोरे, श्री. वा. भि. पटवर्धन, श्री. शि. कृ. जोशी आदि मंडळी असत. सर्व बाजूनी साधक बाधक विचार होऊन संस्था स्थापन करायचा विचार नक्की झाला व सर्व तयारी पूर्ण होताच – “अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी” या नावाने संस्थेची स्थापना २७ मार्च १९३३ रोजी झाली.

Designed & Maintained by Aaryak Solutions